राज्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी – राज्यमंत्री पंकज भोयर यांची विधान परिषदेत घोषणा..

24 प्राईम न्यूज 5 Jul 2025

– राज्यातील बोगस शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याची गंभीर दखल घेत शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शुक्रवार, ४ जुलै रोजी विधान परिषदेत राज्यस्तरीय विशेष तपास पथक (एसआयटी) गठित करण्याची घोषणा केली.

या एसआयटीमध्ये आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांसह न्यायालयीन व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे. शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अराजकता निर्माण झाली असून, शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे संपूर्ण यंत्रणा बदनाम झाली आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अपक्ष आमदार सुधाकर अडबाले यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित करत, एकूण घोटाळ्याची रक्कम १ हजार कोटींहून अधिक असल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे, हा घोटाळा केवळ उपराजधानीपुरता मर्यादित नसून, त्याची पाळेमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.