चिमणपुरी पिंपळे परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरूच; शेतातील मोटार, रिक्षाची बॅटरी आणि वायर चोरीला.


अमळनेर तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे परिसरात चोरट्यांनी हैदोस घातल्याची घटना पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. या भागात गेल्या काही दिवसांत सतत चोरीच्या घटना घडत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

राजेंद्र मन्साराम पाटील यांच्या पिंपळे खुर्द शिवारातील शेतात विहिरीवर बसवलेली सुमारे ४५०० रुपयांची टेक्समो कंपनीची मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना २२ जून रोजी उघडकीस आली.
त्याचप्रमाणे मनोहर दिलीप चौधरी यांनी सार्वजनिक जागेत उभी केलेली रिक्षा यामधून बॅटरी चोरीला गेली, तर ग्रामपंचायतीच्या बोअरवेलची सुमारे ५०० फूट वायरही अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.
या प्रकारांमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, भुरट्या चोरट्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.