“२६/११ च्या हल्ल्यादरम्यान मी मुंबईतच होतो” – तहव्वूर राणाची चौकशीत धक्कादायक कबुली..

24 प्राईम न्यूज 8 Jul 2025

– २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाने राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) व मुंबई गुन्हे शाखेच्या चौकशीत धक्कादायक माहिती दिली आहे. “होय, मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट होतो. मी डेव्हिड हेडलीसोबत लष्कर-ए-तोयबाच्या अनेक प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभागी झालो होतो. २६ नोव्हेंबर २००८ रोजी जेव्हा मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा मी मुंबईतच होतो,” अशी कबुली राणाने दिली.

एप्रिल २०२५ मध्ये अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित झाल्यानंतर तपास यंत्रणांनी घेतलेल्या चौकशीत त्याने सांगितले की, पाकिस्तानातील मास्टरमाइंडच्या मदतीने २००५ पासून या हल्ल्याची आखणी सुरू झाली होती. राणाने मुंबईत इमिग्रेशन बिझनेसच्या नावाखाली एक बनावट कार्यालय सुरू केले आणि त्याच जागेचा वापर हल्ल्याचे नियोजन करण्यासाठी करण्यात आला.
त्याने डेव्हिड हेडलीला मुंबईतील विविध महत्त्वाच्या स्थळांची रेकी करण्यासाठी मदत केली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि इतर प्रमुख ठिकाणांची माहिती गोळा करून हल्लेखोरांना दिली गेली, असेही राणाने सांगितले.
राणाने आणखी खुलासा केला की, लष्कर-ए-तोयबा ही संघटना केवळ दहशतवादी कारवाया न करता गुप्तचर संस्थेसारखी कार्य करते आणि त्यामध्ये आयएसआयची (ISI) सक्रीय मदत असते.