अमळनेरातील वाढीव मालमत्तांची फेरमोजणी करा, नागरिकांचे पूर्ण समाधान झाल्यावरच वसुली करा – आ.अनिल पाटील. 10 टक्के लोकवर्गणी रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार – पालिकेला आमदारांच्या सूचना..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – शहरातील वाढीव मालमत्ता धारकांना दिलेल्या अवाजवी कर नोटिसांबाबत नागरिकांनी व्यक्त केलेल्या नाराजीची दखल घेत माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी पालिकेला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. “आपल्या कर्मचाऱ्यांकडून सर्व मालमत्तांची फेरमोजणी करा व नागरिकांचे पूर्ण समाधान झाल्याशिवाय कोणतीही वसुली अथवा अन्य निर्णय घेऊ नका,” असे निर्देश त्यांनी दिले. तसेच 10 टक्के लोकवर्गणी रद्द करण्यासाठी तातडीने शासनाकडे पत्रव्यवहार करून नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

आढावा बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
आमदार पाटील यांच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस माजी नगराध्यक्ष विनोदभैय्या पाटील, मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. सुरुवातीला अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी नागरिकांच्या अपेक्षा व झालेल्या बैठकीचा आढावा मांडला.
आमदार पाटील म्हणाले –
खाजगी संस्थेच्या सर्वेक्षणामुळे नागरिकांना अवाजवी कर नोटिसा मिळाल्याच्या तक्रारी आल्या आहेत, त्यामुळे खाजगी सर्वेक्षणाऐवजी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून फेरमोजणी करावी.
जुन्या मालमत्तांवर वाढीव कर लावू नये. पाणीपट्टीवर 2 टक्के व्याज 31 मार्चनंतरच आकारावे मालमत्ता हस्तांतरणासाठी 2 टक्के आकारणी ऐवजी मार्चपर्यंत हस्तांतरण केल्यास अर्धा टक्का शुल्क आकारण्याचा विचार करावा.
इतर महत्त्वाच्या सूचना
आमदारांनी शहराच्या हद्दवाढीचा आढावा घेतला, पाणीपुरवठा विभागाबाबत सूचना केल्या, तसेच शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्याचा प्रस्ताव मांडला. घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करून आठ दिवसात सुधारणा न झाल्यास कारवाई करणार असल्याचा इशाराही दिला.
बैठकीत मान्यवरांची उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये ऍड. व्ही.आर. पाटील, हिरालाल पाटील, शितल देशमुख, भूषण भदाणे, सुरेश अर्जुन पाटील, विवेक पाटील, राजेश पाटील, दीपक पाटील यांचा समावेश होता.
पालिकेची भूमिका
“आमदार साहेबांनी दिलेल्या सूचनांचा सखोल अभ्यास करूनच निर्णय घेतला जाईल. नगरपरिषदेचे धोरण हे नागरीक हिताचेच असून नागरिकांनीही सहकार्य करावे,” असे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सांगितले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100400/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1180/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट