“फक्त फोटो नको, आरक्षण द्या!” – अशोकजी गोरड यांचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा..

24 प्राईम न्यूज 30 Jul 2025
बुलढाणा – धनगर समाजाला फक्त मतपेटीपुरता वापरू नका, आरक्षणाचा हक्क द्या, असा थेट इशारा सामाजिक कार्यकर्ते अशोकजी गोरड यांनी राज्य सरकारला दिला आहे. आज, २९ जुलै रोजी सरकारने २०१८ मध्ये दिलेल्या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर ‘धनगर आरक्षण फसवणूक दिवस’ साजरा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
अशोकजी गोरड म्हणाले, “२०१४ पासून सत्तेत येण्यासाठी धनगर समाजाच्या भावना वापरल्या गेल्या. पण गेल्या १२ वर्षांत केवळ घोषणा आणि दिलेली आश्वासने हवेत विरली. आता समाज मूर्ख राहिला नाही, तो जागृत, संघटित आणि निर्णायक झाला आहे.”
ते पुढे म्हणाले, “’लाडका समाज’, ‘आपल्या मनाचा समाज’ अशी घोषवाक्यं दाखवून केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होतो. प्रत्यक्षात मात्र फाईल एक खात्यातून दुसऱ्यात ढकलल्या जातात. आरक्षणाचा निर्णय न्यायालयात नव्हे, तर विधानसभेत कायदा करूनच घ्यावा लागेल.”
गोरड यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “सत्ताधाऱ्यांनी वेळेत निर्णय घेतला नाही, तर धनगर समाज आगामी निवडणुकांमध्ये कोणाला सत्तेवर आणायचं आणि कोणाला घरी बसवायचं हे ठरवेल. आता केवळ निवडणुकीत फोटो लावू नका, आरक्षण द्या – अन्यथा पश्चातापाची वेळ येईल.”