३० जुलै पर्यंतची मुदत संपली, तरीही ५७ हजार ३४४ लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रलंबितलाभ नाकारला जाण्याची शक्यता, शेवटच्या दिवशीही प्रतिसाद कमी– लाभ नाकारला जाण्याची शक्यता.

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर तालुक्यातील स्वस्त धान्य योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या तब्बल २ लाख १४ हजार ६३३ लाभार्थ्यांपैकी ५७ हजार ३४४ लाभार्थ्यांचे ई-केवायसी अद्याप पूर्ण झालेले नाही. आज (३० जुलै) ही अंतिम मुदत असून, तरीही अनेकांनी केवायसी प्रक्रियेची पूर्तता केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुरवठा निरीक्षण अधिकारी रुकसाना शेख यांनी सांगितले की, “ज्या नागरिकांचे अंगठे उमटत नाहीत, त्यांचे केवायसी POS मशीनवर होऊ शकत नाही. मात्र, ते ‘मेरा ई-केवायसी’ या मोबाईल अॅपच्या माध्यमातून चेहरा ओळख किंवा मोबाईलवर OTP मागवून घरबसल्या केवायसी करू शकतात.”
शासन दरमहा गरीब, गरजू व आर्थिक दुर्बल घटकांना मोफत व स्वस्त धान्य पुरवते. यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अनेक लाभार्थ्यांनी अद्याप लिंकिंग प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. परिणामी, त्यांना केवायसीमध्ये अडचणी येत आहेत.
वृद्ध आणि निराधार नागरिकांना अडचणी
वयोवृद्ध व निराधार लाभार्थ्यांचे अंगठे उमटत नसल्याने त्यांना सतत चकरा माराव्या लागत आहेत. शासनाने मुदत वारंवार वाढवून देखील लाभार्थ्यांनी अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही. यामुळे, केवायसी अपूर्ण राहिलेल्या कुटुंबांना आगामी महिन्यांपासून धान्यवाटप थांबवले जाऊ शकते, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
तालुक्यातील संक्षिप्त आकडेवारी अंत्योदय रेशन कार्ड: ८,७६४ लाभार्थी युनिट: ३५,२७१ प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड: ४३,५६४ लाभार्थी युनिट: १,७९,३६२ एकूण रेशन कार्ड: ५२,३२८ एकूण लाभार्थी: २,१४,६३३ ई-केवायसी अपूर्ण: ५७,३४४
तत्काळ कारवाईचे आवाहन शासनाकडून याबाबत वारंवार सूचनाही देण्यात आलेल्या असून, लाभ मिळवायचा असल्यास केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. नागरिकांनी शेवटच्या दिवशी किंवा तत्काळ ‘मेरा ई-केवायसी’ अॅपचा वापर करून ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाचे आवाहन आहे.