अमळनेर पोलीसांच्या हाती गावठी पिस्तुल विक्री करणारे दोन इसम पकडले; ₹1.66 लाखांचा मुद्देमाल जप्त..

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर दि. 28 ऑगस्ट रोजी अमळनेर शहरातील चोपडा रोड परिसरात गावठी बनावटीच्या पिस्तुलांचा अवैध व्यापार करणार्या दोन इसमांना अमळनेर पोलीसांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईत दोन गावठी पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे आणि दोन मोटारसायकली असा एकूण ₹1,66,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचला. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास संत आसाराम बापू आश्रमाजवळ संशयित इसम पोलीसांना पाहून पळ काढू लागले. मात्र, पथकाने त्यांना शिताफीने पकडले. चौकशीत त्यांनी आपली नावे विशाल भैय्या सोनवणे (वय 18, रा. ढेकुसिम, ता. अमळनेर) व गोपाल भिमा भिल (वय 30, रा. सत्रासेन, ता. चोपडा, जि. जळगाव) अशी सांगितली.
त्यांच्याकडून जप्त केलेला मुद्देमाल :
गावठी बनावटीच्या दोन पिस्तुले (किंमत ₹60,000)सहा जिवंत काडतुसे (किंमत ₹6,000) दोन मोटारसायकली (किंमत ₹1,00,000) दोन्ही आरोपींना परवाना नसल्याने त्यांच्यावर अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून, गु.क्र. 352/2025, शस्त्र अधिनियम कलम 3, 25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पो.उप.नि. नामदेव बोरकर हे करीत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद पार्श्वभूमीवर जिल्हाभरात शस्त्रबंदी आदेश लागू आहे. बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर कठोर कारवाई होणार असून, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे.