कळमसरे येथे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी; अधिकाऱ्यांनी घेतला नुकसानीचा आढावा.

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुका (कळमसरे):
अलीकडील मुसळधार पावसामुळे कळमसरे गावात मोठ्या प्रमाणावर शेतीचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मीनल करणवाल, गटविकास अधिकारी श्री. एन. आर. पाटील आणि तहसीलदार श्री. रुपेश कुमार सुराणा यांनी गावाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती तसेच लगतच्या शेतजमिनींची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे काही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
शेतकऱ्यांनी तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाकडे अहवाल सादर करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
गावातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने या पाहणीदरम्यान उपस्थित होते.