निवृत्त आदर्श शिक्षक रघुनाथ शिंदे यांचा रंगला अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा..

अमळनेर ( प्रतिनिधि )
अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील मूळ रहिवासी तथा जिल्हा परिषद शाळेचे निवृत्त आदर्श शिक्षक रघुनाथ शिंदे यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा नुकताच बन्सीलाल पॅलेस येथे उत्साहात पार पडला.
रघुनाथ शिंदे आदर्श शिक्षक तथा हाडाचे शिक्षक म्हणून संपुर्ण तालुक्यात सुपरिचित होते. जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. स्कॉलरशिप परीक्षेत दरवर्षी आपली मुलं पात्र ठरविणारच हे त्यांचे त्यावेळेचे वैशिट्य होते. आयुष्यभर प्रामाणिक सेवा देत असताना त्यांनी आपले कुटुंब देखील उत्तमरित्या सांभाळून मुलांना उच्चशिक्षित केले. तसेच निवृत्ती नंतर देखील सामाजिक व धार्मिक कार्यात ते सक्रिय आहेत. शहरातील ढेकू रोडवर वास्तव्यास असताना आपल्या घरासमोर मोठे बाबा मंदिर बांधण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. अश्या या थोर व्यक्तिमत्त्वाचा अमृत महोत्सवी वाढदिवस कुटुंबीयांनी मोठ्या थाटात साजरा केला. यावेळी उपस्थित त्यांची मित्र मंडळी नातेवाईक यांनी मनोगत व्यक्त करून त्यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला. तर गायक उदय पाटील व गायिका सौ.अपेक्षा पवार यांनी संगीताचा कार्यक्रम सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. मुलांनीही मनोगत व्यक्त करीत जीवन परिचय करून दिला. यावेळी सौ.मंगलाबाई शिंदे तसेच मुलं भानुदास, चंद्रशेखर, सून पुनम पाटील व क्रांती पाटील तसेच नातू जय, स्वामी, समर्थ, विवेक, मृदुल, मित्र मंडळी व नातेवाईक उपस्थित होते. सूत्रसंचालन गिरीश चौक यांनी केले.