सलमान गोळीबार प्रकरणपोलीस कोठडीत आरोपीची आत्महत्या..

24 प्राईम न्यूज 2 May 2024
अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराजवळ झालेल्या गोळीबाराप्रकरणातील आरोपी अनुज थापन (३२) याने मुंबई पोलिसांच्या मुख्यालयातील कोठडीत बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास करण्यात येणार आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
थापनला ठेवण्यात आलेल्या कोठडीत एकूण १० आरोपी होते. सलमान प्रकरणातील अन्य दोन आरोपींना पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी नेले होते व थापन अन्य आरोपींसह कोठडीतच होता. दुपारी १२च्या सुमारास आरोपींना देण्यात येणाऱ्या चादरीचा तुकडा फाडून तो शौचालयात गेला. तेथेच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी १च्या सुमारास अन्य एका आरोपीने हा प्रकार पाहिला व आरडाओरडा करून पोलिसांना बोलाविले. थापनला (पान ७ वर) (पान १ वरून) तातडीने जीटी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आझाद मैदान पोलिसांनी रुग्णालयात जाऊन प्राथमिक माहिती घेतली व मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठविला. कोठडीत आरोपीचा मृत्यू झाल्यानंतर त्रयस्थ पोलीस विभागामार्फत चौकशी करण्यात येते. थापनने गुन्हे शाखेच्या कोठडीत आत्महत्या केल्यामुळे आता याप्रकरणी सीआयडीमार्फत तपास करण्यात येणार आहे.