संत सखाराम महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्याने दुमदुमली अमळनेर नगरी..

अमळनेर/प्रतिनिधी
भक्ती ,शक्ती आणि परंपरेचा दिसला अपूर्व संगम
अमळनेर :-येथील संत सखाराम महाराज विठ्ठल रुख्मिणी संस्थानचा पालखी मिरवणूक सोहळा काल बुद्ध पौर्णिमेला 23 मे रोजी उत्साहात पार पडला. सालाबादप्रमाणे यंदाही भक्ती ,शक्ती आणि परंपरेचा अपूर्व संगम दिसून आला.
ग्रामीण भागातील भाविकांनी 22 रोजी रात्री पासूनच बोरी नदी पात्रात गर्दी केली होती.संत सखाराम महाराजांच्या यात्रोत्सव काळातील रथ नंतर पालखी मिरवणूक महत्वाचा घटक मानला जातो. संपूर्ण महाराष्ट्रातून पालखी मिरवणुकीसाठी भाविक हजेरी लावत असतात. सकाळी ६ वाजेला विधिवत पूजा करून वाडी संस्थान मधून पालखी मिरवणुकीला शुभारंभ झाला.पालखीत सजावट केलेली हातात धनुष्य बाण घेतलेली मूर्ती,पादुका ठेवण्यात आल्या होत्या.याशिवाय हनुमान गरुड प्रतिमा अन्य रथात होत्या.पालखीच्या पुढे,प्रतापकुमार व्यायाम शाळाचे लेझीम पथक तसेच व्यायामशाळा व मंडळाचे ढोल पथक ,भुसावळ येथील रेल्वे बँड पथक आणि पिंपळे रोडवरील ढोल पथक,राजेंद्र गुरव शहनाई पार्टी तर सायंकाळ नंतर चाळीसगाव येथील सद्गुरू बँड पथक यांचे आकर्षण होते. त्या पाठोपाठ मेणा,निशाणाचे घोडेस्वार , भालदार चोपदार त्या पाठोपाठ पालखी आणि पालखीच्या मागे हभप प्रसाद महाराज अनवाणी चालत होते. सकाळपासून महिला ,पुरुष ,वृद्ध बालकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. रस्त्यात परंपरेप्रमाणे महाराज ठरल्या ठिकाणी असंख्य भाविकांच्या घरी पान सुपारीला थांबले होते. सराफ बाजार परिसरात लायन्स क्लबतर्फे मठ्ठा,राजहोळी चौक मित्र मंडळ तर्फे कैरीचे पन्हे, विक्रांत पाटील व लक्ष्मण महाजन मित्र परिवार तर्फे पोहे,सोनार असोसिएशनचे मुकुंद विसपुते यांच्या तर्फे केळी,पानखिडकी मित्र परिवार तर्फे सरबत,गोपाल चौक मित्र मंडळ तर्फे उपमा,कुसुमाई बिझिनेस ग्रुपतर्फे मसाले भात व शिरा राजे संभाजी मित्र मंडळ तर्फे चिंच पन्हे व इतर सामाजिक संस्था तर्फे विविध थंड पेय आणि पदार्थांचा महाप्रसाद मोफत वाटण्यात आला.
वाडी चौक ,राज होळी चौक ,पानखिडकी , दगडी दरवाजा , फरशी पूल ,मारुती मंदिर ,पैलाड मार्गे बोरी नदीच्या वाळवंटातून पालखी मिरवणूक नदी पात्रातील समाधी मंदिराजवळ पोहचली. त्याठिकाणी संत प्रसाद महाराजांनी गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला.
पालखी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासनाने परिश्रम घेतले.तर असंख्य सेवेकरी व भाविकांचे सहकार्य लाभले.