लाडकी बहीणला महिनाभराची मुदतवाढ. -३० सप्टेंबरपर्यंत करता येईल अर्ज नोंदणी

24 प्राईम न्यूज 3 Sep 2024. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना आता ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. महिला आणि बालविकास विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे. राज्य सरकराने जून महिन्यात राज्याचा सन २०२४- २५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेनुसार पात्र महिलांच्या बँक खात्यात महिना १ हजार ५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने १ जुलै २०२४ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. सरकारच्या या योजनेला राज्यभरातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एक कोटीहून अधिक महिलांनी नया योजनेसाठी अर्ज केले आहेत. सुरुवातीला या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ अशी होती. ही मुदत संपल्याने योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र महिलांना मिळावा यासाठी अर्ज भरण्यास ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.