दहावीच्या अंतिम परीक्षेच्या अर्जासाठी २० नोव्हेंबरची मुदत..

24 प्राईम न्यूज 6 Nov 2024.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी तसेच मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी वाढीव मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना बुधवार ६ नोव्हेंबरपासून मंगळवार १९ नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येतील. विलंब शुल्कासह २० नोव्हेंबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करता येतील असे राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी एक प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवले आहे. दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. तसेच व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने कनिष्ठ महाविद्यालयातर्फे भरण्यात येतील. यासाठी ५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र आता अर्ज भरण्यास १९ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.