घर खाली करण्यावरून भाडेकरू कुटुंबाला मारहाण. -घरमालकासह चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल

आबिद शेख/ अमळनेर. घर खाली करण्यावरून वाद होऊन घरमालकाच्या कुटुंबाने भाडेकरूंच्या कुटुंबाला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना ७ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गुरुकृपा कॉलनी येथे घडली.
अनिल चिंधा पवार हे त्यांच्या कुटुंबियांसह गुरुकृपा कॉलनीत पुनमचंद मंजी चव्हाण यांच्या घरात २ वर्षाप्सून भाड्याने राहतात. ७ रोजी संध्याकाळी पुनमचंद व त्यांचा मुलगा राजेंद्र पुनमचंद चव्हाण, श्रीकांत पुनमचंद चव्हाण, मीना राजेंद्र चव्हाण हे आले आणि त्यांनी घर खाली करण्यास सांगितले. तेव्हा अनिल याने त्यांना सांगितले की मी तुम्हाला दिलेले १ लाख २० हजार रुपये उसनवार दिलेले परत करा मी तुमचे घर खाली करतो. तेव्हा ते चारही जण शिवीगाळ करू लागले म्हणून प्रमिला चिंधा पवार हिने त्यांना सांगितले की शिवीगाळ करू नका त्यावेळी राजेंद्र चव्हाण याने प्रमिला हिला लाज वाटेल अशा पद्धतीने पकडून शिवीगाळ करू लागला. आणि चौघांनी लाकडी दांडक्याने अनिल यास डोक्यावर, नाकावर व पाठीवर मारहाण केली. अनिलचा भाऊ भरत चिंधा पवार आवरायला आला असता त्याला व प्रमिला यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण केली. उपचारासाठी धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात गेल्याने उशिराने अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५,३५२ प्रमाणे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.