कवी अजय भामरे ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशिपने सन्मानित !

0

आबिद शेख/ अमळनेर
‘भारतीय दलित साहित्य अकॅडमी, दिल्ली’ या संस्थेचे ४० वे राष्ट्रीय साहित्यकार संमेलन व पुरस्कार वितरण दि. ८ व ९ डिसेंबर रोजी दिल्ली येथे घेण्यात आले. या कार्यक्रमात कवी अजय भामरे यांना “महात्मा ज्योतिबा फुले फेलोशिप राष्ट्रीय अवार्ड-२०२४” प्रदान करण्यात आला.
यापूर्वी अजय भामरे यांना तात्यासाहेब ज्योतीराव फुले राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत पारितोषिक मिळालेले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र व गोवा यांचे द्विस्तरीय राज्य काव्य स्पर्धेत त्यांच्या कवितेला प्रथम क्रमांकाचे बक्षीस ही मिळालेले आहे. कवी अजय भामरे‌ यांचा ‘क्रांती लहर’ हा काव्य संग्रह असून या काव्यसंग्रहाला जळगाव येथील बहिणाबाई प्रतिष्ठानच्या वतीने उत्कृष्ट काव्यसंग्रह म्हणून ‘सोपान देव पुरस्कार’ही प्राप्त झालेला आहे.
दिल्ली येथील ‘भारतीय दलित साहित्य अकॅडमी’ ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, साहित्य, राष्ट्रीय एकात्मता, प्रबोधनात्मक काम करणाऱ्यांना तसेच दलित व वंचित घटकांसाठी झिजणाऱ्या व्यक्तींना फेलोशिप देत असते. आजपर्यंत त्यांनी विविध राज्यातून आलेल्या कर्तुत्ववान लोकांना पुरस्कार दिलेले आहे. दिल्ली येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास माजी मंत्री संघप्रिय गौतमजी हे उपस्थित होते. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत काम करण्याचा अनुभव आहे. त्यांनी समाजाशी एकरूप होऊन घनिष्ठ नाळ जोडून ठेवलेली आहे. विविध सामाजिक कार्यात करण्याचा त्यांचा हातखंडा आहे.
या समारंभाला भारतीय दलित साहित्य अकॅडमीचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. पी. सुमनाक्षर, राष्ट्रीय सचिव जय सुमनाक्षर, प्रोफेसर रतनलाल सोनाग्रा तसेच अनेक आजी, माजी मंत्री कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित होते.
कवी अजय भामरे यांना दिल्ली येथील ‘महात्मा ज्योतिबा फुले फेलोशिप राष्ट्रीय अवार्ड- २०२४’ मिळाल्याबद्दल त्यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!