दूध आणण्यासाठी गेलेल्या महिलेची सोनसाखळी लांबवली

अमळनेर शहरातील मंगलमूर्ती चौकात दूध आणण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी दोन अज्ञात मोटरसायकलस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना २९ जानेवारी रोजी सायंकाळी घडली.
अल्काबाई सुभाष लोहार (वय ५९, रा. प्रताप मिल कंपाउंड) या दूध घेऊन घरी परतत असताना दोन दुचाकीस्वारांनी वेगाने येत त्यांच्या गळ्यातील १४.५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने ओढली आणि ते गावातील पेट्रोल पंपाच्या दिशेने फरार झाले.
या प्रकरणी अल्काबाई लोहार यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करत आहेत.