राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन पौष्टिक आहार योजना लागू..

24 प्राईम न्यूज 31 Jan 2025
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना आता मध्यान्ह भोजनात विविध प्रकारचे पौष्टिक आहार मिळणार आहेत. यामध्ये व्हेजिटेबल पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, अंडा पुलाव, गोड खिचडी आणि नाचणीचे सत्व समाविष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासंदर्भात आलेल्या तक्रारींच्या आधारावर शालेय शिक्षण विभागाने आहार पद्धतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
याप्रमाणे, विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात १२ विविध पाककृतींचा समावेश करण्यात आले आहे. केंद्र पुरस्कृत पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत, राज्यातील पात्र शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ मिळतो.
या योजनेत पहिली ते पाचवीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनांचा समावेश आहे, तर सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिनांचा आहार दिला जातो. याबरोबरच तांदळापासून बनविलेल्या पोषण आहाराचा लाभही विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.