डॉ. वर्षा लहाडे विरोधात चौकशी समिती गठीत – आठ दिवसांत कार्यवाहीचे आश्वासन, अन्यथा पुन्हा कामबंद आंदोलनाचा इशारा..

नंदुरबार (फहीम शेख)
नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या कथित भ्रष्टाचार व मनमानी कारभाराविरोधात विविध सामाजिक संघटना आणि आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले होते. 33 दिवसांपासून सुरू असलेल्या या बेमुदत धरणा आंदोलनामुळे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्य पातळीवरील चौकशी समिती गठीत केली आहे.
चौकशी समितीने 24 व 25 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले. आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात ऑनलाईन ट्रान्झेक्शनचे पुरावे घेतले गेले असून, 300 ते 400 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले जबाब लेखी स्वरूपात दिले आहेत. समितीने आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करून अहवाल दोन दिवसांत आरोग्य भवन, मुंबई येथे सादर करण्यात येईल, तसेच आठ दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
जर ठराविक कालावधीत डॉ. वर्षा लहाडे यांच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही, तर जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर आरोग्य यंत्रणांतील सर्व अधिकारी-कर्मचारी आणि सामाजिक संघटनांनी पुन्हा कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तात्पुरत्या स्वरूपात हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.