पाकिस्तानला माहिती पुरविल्याप्रकरणी प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक.


24 प्राईम न्यूज 18 May 2025
पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरविल्याप्रकरणी एकूण ६ भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली असून, यामध्ये हरियाणाची प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्राचाही समावेश आहे. ‘ट्रॅव्हल विथ जो’ या नावाने तिचे यूट्यूब चॅनेल असून, २०२३ साली कमिशन एजंटच्या मदतीने व्हिसा मिळवून तिने पाकिस्तान दौरा केला होता.

या दौऱ्यात दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात कार्यरत असलेल्या एहसान-उर-रहीम ऊर्फ दानिश याच्याशी तिचा संपर्क आला होता. भारत सरकारने दानिशला अनावश्यक व्यक्ती घोषित करत १३ मे रोजी उच्चायुक्तालयातून हाकलून लावले. त्यानेच ज्योतीची ओळख पाकिस्तानी गुप्तचर संस्थेशी करून दिल्याचा आरोप आहे.
ज्योती सोशल मीडियावरून पाकिस्तानी ऑपरेटिव्ह शाकिर ऊर्फ राणा शाहबाजच्या संपर्कात होती. तिने त्याचा नंबर ‘जट रंधवा’ या नावाने सेव्ह केला होता. पाकिस्तानच्या बाजूने सकारात्मक वातावरण तयार करण्याचे काम तिच्याकडून घेण्यात येत होते, अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.