सावधान! स्टेट बँकेच्या नावाखाली मोबाईल हॅकिंगचे प्रकार – अमळनेर पोलिसांचा इशारा..

आबिद शेख/अमळनेर

जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सध्या एक धोकादायक प्रकार घडत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या नावाने पाठवली जाणारी “epk फाईल” उघडल्यास संबंधित व्यक्तीचा मोबाईल हॅक होत आहे. या हॅकिंगच्या माध्यमातून ग्रुपच्या सेटिंग्ज बदलल्या जात असून, ग्रुप आयकॉनही “SBI – State Bank of India” असे बदलण्यात येत आहेत.

या घटनेची गंभीर दखल घेत अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी शिक्षक व सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, अशी कोणतीही फाईल आली असल्यास ती उघडू नये आणि मोबाईल हॅक झाल्यास त्वरित सायबर पोलीस विभागाशी संपर्क साधावा.
अमळनेर तालुक्यातील दोन शैक्षणिक व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये असे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या ग्रुपचे डीपी आणि आयकॉन बदलण्यात आले असून, त्यात बनावट SBI लिंक देखील पाठवल्या गेल्या आहेत.
संजय पाटील, तालुकाध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघ, अमळनेर (मो. 9422734106 / 7020188483) यांनीही याबाबत जागरूकतेचे आवाहन केले असून सर्व शैक्षणिक कर्मचाऱ्यांनी काळजी घेण्याची विनंती केली आहे.