कामगार संघटनांची ‘भारत बंद’ची हाक; २५ कोटी कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता.


24 प्राईम न्यूज 9 Jul 2025
केंद्र सरकारच्या अर्थ आणि कामगार धोरणांविरोधात देशातील दहा प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने बुधवारी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या आंदोलनात संलग्न शेतकरी व ग्रामीण कामगार संघटनांचाही सहभाग राहणार आहे.

ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या (आयटक) अमरजीत कौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपात बँकिंग, विमा, टपाल सेवा, कोळसा खाणकाम, कारखाने व राज्य परिवहन यांसारख्या विविध क्षेत्रांतील सुमारे २५ कोटी कर्मचारी सहभागी होऊ शकतात. आंदोलनामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होण्याची शक्यता असूनही, अद्याप अधिकृत रेल्वे संपाची घोषणा झालेली नाही.
संघटनांनी केंद्र सरकारवर थेट आरोप करत सांगितले की, हा ‘भारत बंद’ सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि राष्ट्रविरोधी धोरणांच्या निषेधार्थ पुकारण्यात आला आहे.
कामगार संहितांचा तीव्र विरोध
गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार विविध कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून चार मुख्य संहितांच्या माध्यमातून नवे नियम तयार करत आहे. संघटनांचा आरोप आहे की हे संहिताकारण उद्योगांना पोषक असून, कामगारांच्या एकतेला बाधा आणणारे आहे. त्यामुळे कामगारांच्या सामूहिक सौदाशक्तीवर आणि आंदोलनाच्या अधिकारावर गदा येणार असल्याचे संघटनांचे मत आहे.
हा बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन संघटनांनी केले असून, जनतेने आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.