अमळनेरअल्फैज उर्दू कन्या शाळेत विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची मागणी तीव्र..

आबिद शेख/अमळनेर

राज्यात शालेय मुलींवरील अत्याचार, फसवणूक आणि गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असताना, अमळनेर शहरातील अल्फैज उर्दू कन्या शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शाळेच्या प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची जोरदार मागणी स्थानिक नागरिक व पालक वर्गाकडून करण्यात आली आहे.

अलीकडील काळात मुलींना फूस लावणे, त्रास देणे, आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटना समोर येत असल्याने, पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः अल्फैज शाळा ही संपूर्णपणे मुलींसाठी असून, त्यामुळे अधिक दक्षतेची गरज असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. भविष्यात कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मागणीसाठी इम्रान खाटीक, आरिफ पठाण, इमरान शेख, अख्तर अली, राजू टेलर व फिरोज पठाण या स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत शाळेच्या मुख्याध्यापिका व संचालक मंडळाशी भेट घेऊन लवकरात लवकर सीसीटीव्ही बसवण्याची विनंती केली.
सुरक्षा हा मुलभूत हक्क असून, विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी ही मागणी अत्यंत योग्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने या बाबतीत त्वरित सकारात्मक पावले उचलावीत, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.