घरफोडीचे 60 पेक्षा अधिक गुन्हयातील सराईत आरोपी नंदुरबार पोलीसांच्या ताब्यात..!

नंदुरबार/प्रतिनिधि

स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीसांची संयुक्त कामगिरी, आरोपीकडून 6,27,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत घरफोडीचे एकुण 04 गुन्हे उघड..
दि. 08/08/2025 रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीत राहणारे फिर्यादी नामे हर्षल सोनार, व्यवसाय-सायबर कॅफे, रा. ठाकुर कॉम्प्लेक्स जवळ, कोकणी हिल, नंदुरबार यांचे राहते घरात दिवसा कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे संमतीशिवाय प्रवेश करुन मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून फिर्यादी यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेले म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 479/2025 भा.न्या. संहिता 2023 चे कलम 305(a), 331(3) अन्वये अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना दि. 16/08/2025 गोपनीय माहिती मिळाली की, वर नमुद गुन्हयातील तसेच घरफोडीतील सराईत आरोपी नामे जिमी ऊर्फ दिपक शर्मा हा नंदुरबार शहरातील गुरुकुल नगर परीसरात फिरत असुन तो दिल्लीला पळून जाण्याचे तयारीत आहे, अशी खात्रिशीर माहिती मिळालेवरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांना सदर बाबत माहिती देऊन दोन वेगवेगळी पथके आरोपीचा शोध घेणेकामी रवाना केले.
स्था.गु.शा. व शहर पोलीस ठाण्याचे पथकांनी मिळालेल्या गोपनिय माहितीप्रमाणे सराईत आरोपी नामे जिमी ऊर्फ दिपक शर्मा याचा शोध घेण्यासाठी सापळा रचला असता तो गुरुकुल नगर परीसरात फिरतांना दिसून आला. त्यास पोलीस पथकांनी कुठल्याही प्रकारचा संशय न येऊ देता शिताफिने ताब्यात घेतले. त्यास ताब्यात घेऊन नमुद गुन्हयाबाबत विचारपुस करता तो असंबंध्द अशी उत्तरे देऊ लागला, त्यामुळे पथकाने आरोपीस
अधिकचे विश्वासात घेऊन विचारता त्याने नमुद गुन्हयाची कबूली देऊन हकिगत सांगितली. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी धुळे जिल्हयातील शिरपूर शहरात 01 व पिंपळनेर येथे 02 अशा घरफोडी देखील केल्या असल्याचे सांगितले,
त्याअन्वये दिवसा घरफोडी करणारा सराईत आरोपी नामे जिम्मी ऊर्फ दिपक बिपीन ऊर्फ अरमित शर्मा, वय- 32 वर्षे, रा. प्लॉट नं. 4अ, गुरुकुल नगर, नंदुरबार ता. जि. नंदुरबार याचेकडून नमुद गुन्हयातील एकुण 6 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल त्यात सोन्याचे दागिने, मोबाईल व वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन धुळे जिल्हयातील 3 व नंदुरबार शहरातील 01 असे एकुण 04 घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात नंदुरबार पोलीसांना यश मिळाले आहे. सदर आरोपीविरुध्द महाराष्ट्रातील विविध जिल्हयात तसेच परराज्यातील गुजरात, हरियाणा, राजस्थान इ. ठिकाणी 60 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असुन सदर सराईत आरोपीला ताब्यात घेण्यात नंदुरबार पोलीसांना यश मिळाले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस. अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, पोउपनि- विकास गुंजाळ, पोउपनि-श्री.छगन चव्हाण, स्था.गु.शा.चे पोहेकों/मोहन ढमढेरे, पोना/अविनाश चव्हाण, पोशि/अभय राजपुत तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोहेकों/दिपक बुनकर, नरेंद्र चौधरी, विनोद महाजन, प्रशांत पाटील, पोशि/किरण मोरे, निंबा वाघमोडे अशांनी केली आहे.