महाभोमयागाने श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्याची सुरूवात. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट व ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी घेतले दर्शन..

आबिद शेख/अमळनेर

अंमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात जन्मोत्सवानिमित्त तीन दिवसीय महासोहळा पर्वाची सुरुवात २९ ऑगस्ट रोजी महाभोमयागाने झाली. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी सपत्नीक श्री मंगळग्रह देवाचे दर्शन घेतले.
भाद्रपद शुद्ध दशमीला दरवर्षी मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे श्री मंगळग्रह देवाचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. विशेष म्हणजे, यंदाचे २०२५ हे वर्ष मंगळग्रह देवाच्या प्रभावाचे असून, यावर्षी मंगळवारीच मंगळ जन्मोत्सव येत असल्याने हा महामंगल योग मानला जात आहे. २ सप्टेंबर रोजी मुख्य जन्मोत्सव सोहळा होणार असून, त्यानिमित्त भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२९ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता सुरू झालेल्या महाभोमयागाचे यजमान विशाल जगन्नाथ पाटील (लंडन), राजेंद्रसिंह आव्हाड (पिंपळगाव हरेश्वर), मिलिंद वाघ (नाशिक), प्रतापराव पाटील (पाळधी), अतुल साबे, एस. एन. पाटील, गुलाब महाजन, अनिल कदम आणि उमेश पाटील (अमळनेर) सपत्नीक होते. सायंकाळी पूर्णाहुतीनंतर महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. मंदिराचे पुरोहित केशव पुराणिक, जयेंद्र वैद्य आदींनी पौराहित्य केले.
या प्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव आदींनी आगंतुक मान्यवरांचा सत्कार केला.
मंत्र्यांचे प्रतिपादन
“अनेक वर्षांपासून मंदिराला भेट देण्याची माझी इच्छा होती. आज जन्मोत्सवानिमित्त योग जुळून आला. एकेकाळी निर्जन असलेल्या ठिकाणी मंदिराचा झालेला विकास व जगभरातून येणाऱ्या भाविकांचा ओघ पाहून विशेष समाधान वाटले.”
– संजय शिरसाट, सामाजिक न्याय मंत्री
खडसेंची भावना
“२७ वर्षांनंतर या महामंगलप्रसंगी दर्शन घेण्याचा योग आला हे माझे भाग्य आहे. मंदिराचा विकास, स्वच्छता व भक्तिमय वातावरण हे वैशिष्ट्यपूर्ण असून भाविकांचा ओघ वाढत आहे. भविष्यात मंदिराचा अधिकाधिक विकास होईल यात शंका नाही.”
– एकनाथराव खडसे, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 104000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 95700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 79000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1215/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट