आबिद शेख/अमळनेर
अमळनेर :- शहरात काल गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडल्यानंतर आज ईद-मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान गांधलीपुरा पोलिस चौकीजवळ अचानक दगडफेक झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेत एका इसमाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अनपेक्षित दगडफेकीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
गणेश विसर्जन आणि ईद-मिलाद मिरवणुकीसाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह मोठा पोलीस फोर्स तैनात करण्यात आला होता.
घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. नेमकी दगडफेक कोणी केली याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचा आधार घेतला जात आहे.
दरम्यान, पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच समाजात तेढ निर्माण करणारे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू नयेत. असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.