नंदुरबारात पैगंबर जयंतीनिमित्त रक्तदान व दंत तपासणी शिबिर; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग..

नंदुरबार/प्रतिनिधि

नंदुरबार : हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त बादशाह नगर येथील अरबी मदरसा आणि जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
शिबिराची सुरुवात जिल्हा रुग्णालयाचे डॉ. रिजवान रंगरेज आणि डॉ. मुबारक सय्यद यांनी स्वतः रक्तदान करून केली. विशेष म्हणजे, या उपक्रमात महिलांनीही पुढाकार घेतला. नरगिस खालिद धोबी, तास्किना शब्बीर रंगरेज यांच्यासह आणखी सहा महिलांनी रक्तदान करून समाजाला प्रेरणादायी संदेश दिला.
डॉक्टरांनी सांगितले की, शहरात महिलांचे रक्तदानाचे प्रमाण अत्यल्प आहे. अशा पार्श्वभूमीवर महिलांचा सहभाग हा कौतुकास्पद आणि समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी मदरसा ग्रुपचे सदस्य जावेद इनामदार, शेख नजीर बहादरपुरी, अनवर पटवे, नसीर धोबी, मसूद धोबी, जुबेर मन्सुरी व फारूक पठाण यांनी विशेष प्रयत्न केले.