सततच्या पावसामुळे कापूस, मका पिकाचे मोठे नुकसान; शेतकरी चिंतेत..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर । पिंपळे
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पिंपळे खु., पिंपळे बु., चिमनपुरी, मंगरूळ, आर्डी, शिरसाळे, अटाळे परिसरातील शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. लाख मोलाच्या कापसाला सर्वाधिक फटका बसला असून, या पिकावर ‘ती मर’ रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

सतत ओलसर हवामानामुळे कापसाच्या झाडांच्या मुळे सडू लागल्या असून झाडांना बुरशी लागली आहे. पाने लालसर होत आहेत. अनेक शेतकऱ्यांचे पीक रोगट होऊ लागले असून काहींची शेती पाण्याखाली गेल्याने आतूनच नुकसान होत आहे. तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची वेळ आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
कापसाबरोबरच मका पिकाचेही नुकसान वाढले आहे. मक्याच्या कणसाला कोंब फुटले असून पीक आडवे पडू लागले आहे. यंदा निसर्गाने सुरुवातीला पिकाला भरभरून साथ दिली होती; मात्र अखंड पावसामुळे शेतकऱ्यांची आशा धुळीस मिळाली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाने तातडीने सरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांपुढील संकट अधिक गंभीर होणार आहे.