कोविड काळातील गुन्हे मागे घेण्याचे शासनाचे आदेश.७७ गुन्हे मागे घेणार…

अमळनेर (प्रतिनिधि ) कोविड काळातील दाखल गुन्हे मागे घेण्याच्या शासन आदेशाची अमलबाजवणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. यात सुमारे ७७ प्रस्तावावर चर्चा करण्यात आली
कोविड काळात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर भादवि कलम १८८, २६९, २७०,२७१ ,तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये ,साथ रोग नियंत्रण कायदा , कलम ३७ सह कलम १३५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यात अडचणी येत असल्याने शासनाने सप्टेंबर २०२२ मध्ये गुन्हे मागे घेण्यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून प्रस्ताव मागवण्याचे निर्देश दिले होते. यात प्रामुख्याने सार्वजनिक मालमत्तेचे ५० हजाराच्या वर नुकसान नसेल तर नुकसान भरपाई करून असा गुन्हा मागे घेण्यात यावा ,वरील प्रकारच्या कलमाप्रमाणे दाखल असलेले मात्र कोणत्याही सरकारी कर्मचारी अथवा फ्रंटलाईन कर्मचारीवर हल्ले नसतील तर असे गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. आजी माजी आमदार खासदार यांच्यावरच्या गुन्ह्याबाबत मात्र उच्च न्यायालयाची परवानगी लागणार आहे. बैठकीत प्राथमिक स्वरूपावर चोपडा शहर २६, चोपडा ग्रामीण २२, मारवड १७ , अमळनेर १२ प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. दरम्यान अमळनेरात कोविड काळात २४१ गुन्हे दाखल झाले होते पैकी न्यायालयाने ४६ गुन्हे स्वीकारले होते. उर्वरित गुन्ह्याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे मार्गदर्शन मागवण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीस चोपडा परिविक्षाधीन डीवायएसपी कृषिकेश रावळे , डीवायएसपी राकेश जाधव , तहसीलदार मिलिंदकुमार वाघ , तहसीलदार अनिल गावित ,गटविकास अधिकारी विशाल शिंदे , पोलीस निरीक्षक विजय शिंदे ,पोलीस निरीक्षक के के पाटील , पोलीस निरीक्षक कावेरी गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील हजर होते.