अंजनी धरणात पुरेसा पाणीसाठा असूनसुध्दा एरंडोलला मात्र पाण्यासाठी वणवण-दुर्दैव..
भर उन्हाळ्यात 5/6 दिवसांनी नपाचा पाणीपुरवठा- सांगाना पाणी पुरवावे तरी कसे ? महिलांचा संतप्त सवाल…

एरंडोल (कुंदन सिंह ठाकुर ) – मे महिन्यात जळगांव जिल्हा तापतो परंतू यंदा एप्रिलमध्येच कडक तापमान झाल्याने सकाळी 10 वाजेपासूनच सूर्य आग ओकू लागला आहे. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी महिला-मुलांना वणवण फिरावे लागत आहे. वास्तविक अंजनी धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. (एरंडोला पिण्यासाठी राखीव) तरीही 5/6 दिवसांनी नपाचा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे सांगा ना पाणी पुरवावे तरी कसे ? असा संतप्त सवाल महिलांनी केला आहे.
एरंडोल नपाचा कारभार वर्षभरापासून प्रशासकांकडे आहे. अनेक अडचणींना सामोरे जावून नागरीकांच्या समस्या सोडविल्या जात असल्या तरी पाण्याची मात्र गंभीर समस्या आहे. त्यामुळे पाणी केव्हा येणार ? या प्रश्नाने सर्वच हैराण झाले आहेत. इतर शहरांच्या तुलनेत एरंडोलला पाणी मिळते एवढंच. परंतू एक दिवस वाढविण्यापेक्षा एक दिवस कमी केला असता किंवा जैसे थे… तरीही नागरीकांनी धन्यवाद दिले असते.
अवकाळी पाऊस एरंडोल परिसरात नसला तरी वारा-वादळामुळे वीजपुरवठा वारंवार खंडीत होतो. परिणामी शहरातील पाण्याच्या टाक्या वेळेत न भरल्यामुळे पुरवठा विस्कळीत होतो ही वस्तूस्थिती नेहमी सांगितली जाते. परंतू काटेकोर, योग्य नियोजन केल्यास पाणी समस्या चुटकीसरशी सुटू शकणार आहे त्याचं काय ? कारण सध्या सुट्या असून बच्चे कंपनी घरोघरी आहेत. त्यातच लग्नसराईमुळे जिकडे-तिकडे पाहुणेच पाहुणे त्यामुळे पाणी पुरवावे तरी कसे ? असा प्रश्न प्रत्येक घरात विचारला जातो.
एरंडोल शहर जरी असले तरी मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी असल्याने पाणी जास्त साठविणे शक्य नाही. पाणी आल्यावर जेमतेम दोन दिवस (किंवा तीन दिवस) त्यानंतर मात्र ठणठण गोपाल. मग पाण्याच्या टाकीवरून हंडाभर पाणी आणण्यासाठी सुरू होते वणवण, असा हा दररोजचा कार्यक्रम. रविवारी आठवडे बाजार असतो त्या दिवशी काय भाजी करावी ? असा महिलांना प्रश्न तर ज्या दिवशी नळांना पाणी त्या दिवशी आंघोळ करावी, कपडे धुवावेत याचीच धावपळ. ज्या दिवशी नळांना पाणी येणार त्यादिवशी एकजण तरी घरी राहणारच (मजुरी बुडवूनच) अशी ही अवस्था एरंडोल नपा असलेल्या शहराची (?) आहे.
सोशल मीडियावर एक पोस्ट नेहमी एरंडोलला वाचण्यात येते ती म्हणजे पाणीपट्टी वर्षभराची पण पाणी मात्र 5/6 दिवसांनी, त्यानुसार आकारणी करावी…..
महिला वर्गासह शहरातील सर्वच पाण्याने त्रस्त नागरीकांच्या विनंतीचा विचार करून नपाने पाणीपुरवठा करावा, समाधानकारक माहिती मिळावी हीच अपेक्षा…