सिराजमुळे भारत आशियाचा राजा, -सामनावीर पुरस्काराची रक्कम श्रीलंकेच्या मैदानी कर्मचान्यांना भेट

24 प्राईम न्यूज 18 Sep 2023 सिराजने चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर पथुम निसांकाला (२) रवींद्र जडेजाकडे झेल देण्यास भाग पाडले. दुसरा चेंडू सदीरा समरविक्रमाने निर्धाव खेळून काढला. तिसऱ्या चेंडूवर सिराजने त्याला पायचीत पकडले. चौथ्या चेंडूवर त्याने चरिथ असलंकाचा अडथळा दूर केला. हॅट्ट्रिकवर असताना पाचव्या चेंडूवर धनंजय डीसिल्व्हाने चौकार लगावला. सिराजच या चेंडूच्या मागे सीमारेषेपर्यंत धावला. अखेर सहाव्या चेंडूवर सिराजने धनंजयालाही तंबूचा रस्ता दाखवून एकाच षटकात चार बळी मिळवण्याचा पराक्रम केला.
कोलबो भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने रविवारी स्वप्नवत गोलंदाजीचा नजराणा पेश केला. सिराजने २१ धावात सहा बळी टिपण्याचा पराक्रम करताना श्रीलंकेच्या फलंदाजांना अक्षरशः नाचवले. त्यामुळे आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा अवघ्या १५.२ षटकांत ५० धावात खुर्दा झाला. भारताने मग १० विकेट्स आणि २६३ चेंडू राखून सहज विजय मिळवत आठव्यादा ‘आशियाचा राजा’ ठरण्याचा मान मिळवला. भारताने अवघ्या दोन तासाच्या कालावधीत वर्चस्व मिळूवन आशियावर आपलेच राज्य असल्याचे सिद्ध केले. सिराज सामनावीर, तर फिरकीपटू कुलदीप यादव स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.