मुंबईतील ११ ठिकाणे उडवून देण्याची धमकी…
-गर्व्हनरसह केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

24 प्राईम न्यूज 27 Dec 2023 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासह मुंबईत ११ ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल रिझर्व्ह बँकेला प्राप्त झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या मेलमध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
भारताच्या इतिहासातील आतापर्यंतचा मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा दावा करून अज्ञात व्यक्तीने या मेलमध्ये रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरसह केंद्रीय अर्थमंत्र्याच्या राजीनामाची मागणी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास मुंबईत ११ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणू, अशी धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. या गुन्ह्यांचा सायबरसेलचे अधिकारी समांतर तपास करत आहेत.
सकाळी पावणेअकरा वाजता रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर ‘खलिफा इंडिया डॉट कॉम’ या मेलवरून एक मॅसेज आला होता. त्यात अज्ञात व्यक्तीने मुंबई शहरात ११ विविध ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती. रिझर्व्ह बँकेसह इतर खासगी बँकांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. भारताच्या इतिहासातील हा आतापर्यंत सर्वांत मोठा घोटाळा असून त्याला आरबीआयचे गर्व्हनर शशिकांत दास, केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांच्यासह काही खासगी बँकांचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत. या घोटाळ्या संदर्भात त्याच्याकडे भक्कम पुरावे आहेत. त्यामुळे त्याने रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट शाखा, चर्चगेट येथील एचडीएफसी आणि बीकेसीच्या आयसीआयसीआय बँकेसह इतर ठिकाणी बॉम्ब ठेवले आहेत. संबधितांनी तातडीने त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा. या राजीनाम्याची एक प्रसिद्धीपत्र काढून या घोटाळ्याबाबत माहिती द्यावी. तसेच दोषीवर कठोर कारवाई व्हावी, असे आवाहन त्याने केंद्र सरकारकडे केली आहे. त्याची मागणी मान्य झाली नाहीतर तो दुपारी दीडनंतर एकापाठोपाठ एक बॉम्बस्फोट घडवून आणेल, अशी धमकी दिली होती.
या मेलची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बॉम्बस्फोटाची धमकी देऊन दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.