मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना; राज्यातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द..

24 प्राईम न्यूज 22Jan 2023. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे रवाना झाले आहे. त्यामुळे राज्यभरात देखील मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहे. याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पत्र काढण्यात आले आहे. ज्यात 20 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत सर्व पोलीस अधिकारी, अमलदार यांच्या साप्ताहिक सुट्टीसह सर्व प्रकारच्या सुट्ट्या (वैद्यकीय रजा वगळून) रद्द करण्यास घटक प्रमुखांना मान्यता देण्यात आली आहे.
पोलीस महासंचालक कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जालना ते मुंबई असा संभाव्य पदयात्रा करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्या अनुषंगाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेकरिता तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक बंदोबस्तासाठी 20 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत खालील नमुद घटकांमधील सर्व अधिकारी व अंमलदार (कार्यकारी व अकार्यकारी पदावरील) यांच्या साप्ताहिक सुट्टीसह सर्व प्रकारच्या रजा (वैद्यकीय रजा वगळून) बंद करण्यास घटक प्रमुख यांना मान्यता देण्यात येत आहे. तसेच घटकातील साप्ताहीक सुट्टी बंद करताना उपरोक्त संदर्भातील शासन निर्णयाचे तंतोतंत पालन करावे. तरी, घटक प्रमुख यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेकरिता सर्वोतोपरी दक्षता घ्यावी,असे म्हटले आहे..