अजित पवार यांनी कारवाई करूनच दाखवावी. जरांगे पाटील..

24 प्राईम न्यूज 23 jan 2023. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आंदोलनाला भेट देण्यास एकदाही वेळ मिळत नाही आणि आता तेच मुंबईत प्रवेश केल्यास कारवाईची भाषा बोलू लागले आहेत. तर त्यांनी कारवाई करूनच दाखवावी, असे आव्हान मनोज जरांगे यांनी दिले.
जरांगे यांची पदयात्रा सोमवारी नगरहून पुणे जिल्ह्यात गेली. या वेळी मार्गस्थ होण्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत अजित पवार यांना वरील इशारा दिला. मराठा समाजास आरक्षण देण्यासाठी सरकारला वेळ द्यावा आणि मुंबईतील प्रस्तावित आंदोलन मागे घ्यावे, अशी मागणी नुकतीच अजित पवार यांनी केली आहे. याचा संदर्भ देत जरांगेम्हणाले, की सरकारला आजवर सात महिन्यांचा वेळ दिला आहे. या कालावधीत ते कधी भेटायला आले नाहीत. हवे तर त्यांना गाडी देऊ, एसटीचे तिकीट काढून देऊ. पण ते आमच्यावरच कारवाईची भाषा करत आहेत. आता त्यांनी कारवाई करूनच दाखवावी, असे आव्हान जरांगे यांनी दिले. आम्हाला मुंबईत येण्याची परवानगी नाकारली, तर सरकारचीच नाचक्की होईल असाही इशारा जरांगे यांनी या वेळी दिला. आमच्या मागणीमुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताच धक्का लागत नसून, छगन भुजबळ मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.