काँग्रेसमधून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील निलंबित
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कारवाई..

24 प्राईम न्यूज 23 Jan 2023. सत्ताधारी भाजपशी सलगी केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने जळगाव जिल्ह्यातील नेते आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. डॉ. पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉ. वर्षा पाटील आणि युवक काँग्रेसच जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार झालेल्या या कारवाईने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
डॉ. उल्हास पाटील हे जळगाव जिल्ह्यातील महत्वाच्या काँग्रेसएक आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ते काँग्रेस पक्षात सक्रीय होते. १९९८ मध्ये ते काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभेवर निवडून आले होते. नंतरच्या निवडणुकीत त्यांना सातत्याने पराभव स्वीकारावा लागला. तरीही त्यांनी अलीकडे काँग्रेसतर्फे रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छाही व्यक्त केली होती. याशिवाय त्यांची कन्या डॉ. केतकी पाटील यांनीही निवडणूक लढविण्याची तयारी केलेली आहे. काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने डॉ. पाटील यांनी भाजपकडे चाचपणी सुरू केली होती.
ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केल्याचे समजते. दरम्यान, या कारवाईमुळे डॉ. उल्हास पाटील आणि त्यांच्या कुटुंबाचा भाजपमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डॉ. पाटील हे लवकरच भाजप नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वीच मुंबईतील काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. आता देवरा यांच्या पाठोपाठ उल्हास पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने काँग्रेसला लागोपाठ दोन धक्के बसले आहेत.