आईची प्रकृती नीट सांभाळली तर गर्भाचे पोषण नीट होईल. विचाराचा गर्भ भाषेच्या पोटात आकार घेतो.. असे प्रतिपादन जेष्ठ गझलकार शिवाजी जवरे (बुलढाणा )

0

अमळनेर /प्रतिनिधि सध्या मराठीचे अशुद्ध नव्हे तर बेशुद्ध लेखन सुरू आहे. भाषेची विकृती टाळणे महत्वाचे आहे. आपण ज्या भाषेत बोलतो लिहितो त्या भाषेचे व्याकरण जाणून न घेणे म्हणजे आईच्या प्रकृतीला काय मानवते आणि काय मानवत नाही याची माहिती न ठेवण्यासारखे आहे. आईची प्रकृती नीट सांभाळली तर गर्भाचे पोषण नीट होईल. विचाराचा गर्भ भाषेच्या पोटात आकार घेतो असे प्रतिपादन पहिल्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ गझलकार शिवाजी जवरे (बुलढाणा ) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात २७ व २८ रोजी गझल संमेलन आयोजित करण्यात आले आहे. गझल संमेलनाचे उदघाटन जेष्ठ रंगकर्मी व साहित्य अभ्यासक शम्भू पाटील व प्रमुख अतिथींच्या हस्ते पूज्य सानेगुरुजी , कवी सुरेश भट व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. स्वागताध्यक्ष मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक नाना लोढम (अमरावती), जेष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील , दगडू लोमटे (अंबेजोगाई) , उद्योजक शरद पाटील (शहादा) , खान्देश साहित्य संघाचे सचिव रमेश बोरसे , जयवंतराव पाटील , महेंद्र बोरसे , दिलीप सोनवणे , चेतन राजपूत , लायन्स अध्यक्ष दिलीप गांधी , रोटरी अध्यक्ष प्रतीक जैन हजर होते. अध्यक्ष जवरे पुढे म्हणाले की हे गझल संमेलन खऱ्या अर्थाने कोणत्याही रेषा नसलेल्या सार्वजनिक सहभागाचे संमेलन आहे. कविता ही समकालीन भाषेला उंची देणारी कला होय. आता समकालीन भाषेला उंची देणे जसे अपेक्षित आहे तशीच भाषेची स्थानिक संस्कृतीतून उद्धभवलेली अंगभूत वैशिष्टयेही सांभाळली जावीत अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. उदघाटक शम्भू पाटील म्हणाले की अविकसित देशातले मूर्ख लोक परक्या भाषेत शिकतात. तुकारामासारखे कवी ज्या भाषेत आहेत त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पुराव्याची गरज काय ? हिंदी नावाची भाषा अस्तित्वात नाही आपला गैरसमज आहे की हिंदी राष्ट्रभाषा आहे असा दावाही त्यांनी केला. स्वागताध्यक्ष अनिल पाटील म्हणाले की संधी कुणाला मिळते त्याचा उपयोग कुणी कसा घ्यायचा हे त्याच्या नशिबावर व प्रयत्नांवर अवलंबून असते. अमळनेरकर नशीबवान आहेत त्यांना देशभरातील गझलकारांच्या गझल ऐकायला मिळणार आहेत. सूत्रसंचालन संजय पाटील व पूनम बेडसे यांनी तर आभार सुनीता पाटील यांनी मानले. त्यांनंतर संजय गोरडे , अनघा जावकर, सचिन साताळकर , चंद्रकांत धस , शंकर बावणे , बाळासाहेब गिरी , संजय खोत , आदेश कोळेकर , डॉ शामा सिंगबाळ , ज्योत्स्ना राजपूत , दिनेश भोसले , दीपाली सुशांत , लतीफ खालेद शेख , विकास घुघे ,बाळू श्रीराम ,दिनेश कांबळे , वंदना केंद्रे ,माया चव्हाण यांनी स्व कमलाकर देसले व स्व बदीउज्जमा खावर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपल्या गझल सादर केल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!