नारायण राणेंचा आरक्षण अधिसूचनेला विरोध..

24 प्राईम न्यूज 29 Jan 2023
मराठा आरक्षणाच्या राज्य सरकारने शनिवारी काढलेल्या अधिसूचनेला सरकारमधूनच विरोध झाला आहे. केंद्रीय मंत्री, भाजप नेते नारायण राणे यांनी हा निर्णय आपल्याला मान्य नसल्याचे म्हटले आहे. तर राज्य सरकारमधीलच मंत्री छगन भुजबळ यांनीही सरकारच्या अधिसूचनेवर जोरदार आक्षेप घेतला आहे. यामुळे आता या विषयातील पेच वाढण्याची चिन्हे आहेत.
राज्य सरकारने घेतलेल्या मराठा आरक्षणाबाबतच्या निर्णयावर खुद्द राज्य सरकारमधीलच कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी तोफ डागली आहे. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील या निर्णयाला विरोध केला आहे. दोघेही राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत.नारायण राणे तर आधीच्या सरकारमध्ये मराठा आरक्षणविषयक समितीचे प्रमुखच होते. या दोघांच्याही विरोधातील भूमिकेमुळे राज्य सरकारसमोर मोठा पेच निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे नारायण राणे यांनी मराठा समाजाचेखच्चीकरण होत असल्याचे एका बाजूला स्पष्ट करत असतानाच ओबीसी समाजावरही या निर्णयामुळे अतिक्रमण होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नारायण राणे हे सोमवारी कोणती भूमिका स्पष्ट करणार हे पहावे लागणारआहे. छगन भुजबळ यांच्या भूमिकेला यामुळे बळच मिळणार आहे. छगन भुजबळ आणि नारायण राणे हे राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते असून या दोघांच्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेतूनच झाली होती. राज्यसरकारच्या निर्णयाविरोधात आता दोघेही उभे ठाकले आहेत.