मौलाना मुफ्ती अझहरींना अटक. -द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात गुजरात एटीएसची कारवाई..

24 प्राईम न्यूज 5 फेब्र 2024
इस्लामिक धर्मगुरू मौलाना मुफ्ती सलमान अझहरी यांना रविवारी रात्री गुजरात एटीएसने घाटकोपरमधून अटक केली. कथित द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात ही अटक करण्यात आली. अझहरींच्या अटकेची माहिती मिळताच त्यांच्या शेकडो समर्थकांनी घाटकोपर पोलीस ठाण्याला घेराव करून त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस ठाण्याच्या बाहेर पॅरा मिलिटरी फोर्सचे जवान तैनात करण्यात आले. गुजरातच्या जुनागढमध्ये कथित द्वेषपूर्ण भाषण दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जुनागढचे पोलीस अधीक्षक हर्षद मेहता यांनी सांगितले होते की, ते अझहरींचा शोध घेत आहेत. जुनागढमधील ‘बी’ विभाग पोलीस ठाण्याजवळील मोकळ्या मैदानात बुधवारी रात्री आयोजित कार्यक्रमादरम्यान हे द्वेषपूर्ण भाषण करण्यात आले होते. व्हिडीओ व्हायरल होताच अझहरी, स्थानिक आयोजक मोहम्मद युसूफ मालिक आणि अझीम हबीब ओडेदार यांच्या विरोधात भादंविच्या कलम १५३ बी (विविध धार्मिक गटांमधील शत्रुत्व वाढवणे) आणि ५०५ (२) (प्रक्षोभक विधाने करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.