भाजप यादीत महाराष्ट्र वेटिंगवरलोकसभेसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर.

24 प्राईम न्यूज 3 Mar 2024. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आघाडी घेत आज १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, य यादीत महाराष्ट्र ‘वेटिंग’वर असल्याचे स्पष्ट झाले. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची नावे जाहीर केली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (वाराणसी), अमित शहा (गांधीनगर), राजनाथ सिंग (लखनौ) यांच्यासह जवळपास ३४ विद्यमान केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये काँग्रेसचे माजी मंत्री तथा भाजपचे मुंबईतील वादग्रस्त नेते कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबतच

दोन माजी मुख्यमंत्री म्हणजेच मध्य प्रदेशचे शिवराजसिंह चौहान यांना विदिशामधून, तर त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री विप्लबकुमार देव यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.भाजपने शनिवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही. महाराष्ट्रात महायुतीचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्राची यादी मागे ठेवण्यात आल्याचे समजते. महाराष्ट्रातील काही उमेदवार भाजपने • जाहीर केल्यास महायुतीत बंडाळीची शक्यता असल्याने महाराष्ट्रातील भाजप इच्छुकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.
भाजपच्या पहिल्या यादीत १६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशातील एकूण १९५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये उत्तर प्रदेशातील सर्वाधिक ५१ जागांवरील उमेदवार जाहीर केले, तर दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश असून, या राज्यातील २४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. पश्चिम बंगालमधील २०, राजस्थान, गुजरातमधील प्रत्येकी १५, केरळ १२, तेलंगणा ९ यासोबतच इतर राज्यांतील उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये अनुसूचित जातीतील २८, अनुसूचित जमातीतील १८, ओबीसीतील सर्वाधिक ५७ जणांना उमेदवारी दिली.