हुकूमशाही संपवण्यासाठी एकत्र आलोय – उद्धव ठाकरे..

24 प्राईम न्यूज 1 Apr 2024

उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील रामलीला मैदानातील सभेत भाजपवर जोरदार तोफ डागली आहे. ‘निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली. मात्र, भाजपमध्ये गेलेल्या ठगांवरील केसेस मागे घेत त्यांना वॉशिंग मशीनमध्ये धुवून काढले. आम्ही निवडणूक प्रचारासाठी एकवटलो नसून लोकशाहीच्या रक्षणासाठी, हुकूमशाही संपवण्यासाठी एकत्र आलोय, असे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दिल्लीत विरोधी पक्षांतर्फे ‘लोकशाही बचाव’ महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात सगळे विरोधक रविवारी दिल्लीत एकवटले होते. या रॅलीला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या देशातील जनता घाबरणारी नाही तर लढणारी आहे. तुमच्यात हिंमत असेल तर तुमच्या बॅनरवर लिहा की, ‘इंडी, सीबीआय, आयटी डिपार्टमेंट’ हे भाजपचे तीन सहकारी पक्ष आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना तुरुंगात टाकले. हेमंत सोरेन यांच्यावर आरोप करत त्यांना तुरुंगात टाकले, हा काय प्रकार आहे? असा सवाल त्यांनी केला.
