तालुक्यासह शहरात गारपिटीसह वादळी पाऊस

अमळनेर /प्रतिनिधी
तालुक्यातील काही भागांसह शहरात शुक्रवारी (ता.१२) सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली.यावेळी शहरात गारपीट देखील झाली.वादळी वाऱ्याचा जोर एवढा होता की शहरातील अनेक भागात वृक्ष उन्मळून पडले आहेत.शहरासह ग्रामीण भागाचा विद्युत पुरवठा वादळी वाऱ्यामुळे विस्कळीत झाला आहे.
तालुक्यातील कळमसरे,मारवड,धार,तासखेडा, अंतुर्ली या भागात जोरदार गारपीटीसह अवकाळी वादळी पाऊस झाला.यामुळे गहू,हरभरा, मका या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
शहरातील न्यू प्लॉट,ढेकू रोड,पिंपळे रोड,प्रताप मिल कंपाउंड,ख्वाजा नगर,तांबेपुरा या भागात झाडे उन्मळून पडली आहेत.वाऱ्याचा जोर एवढा होता की शहरात ठिकठिकाणी लावलेले बॅनर्स,घरावरील छपरे,शेड पडलेले आहेत.तालुक्यासह शहरात कुठेही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असल्याचा अंदाज आहे.