गुरांची वाहतुक करणारे वाहन पकडले ! अमळनेर पोलिसांची कारवाई.

अमळनेर/प्रतिनिधी. पारोळामार्गे मालेगावला कत्तलीसाठी दहा गुरे निर्दयपणे कोंबून नेत असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडल्याची घटना १९ रोजी सकाळी साडेसहा वाजता तालुक्यातील सडावन येथे दत्त मंदिराजवळ घडली.
हेडकॉन्स्टेबल सुनील महाजन, अमोल पाटील, अशोक कुमावत, सुनील पाटील हे १९ रोजी सकाळी ६ वाजता पारोळा रस्त्यावर गस्त घालत असताना पिकअप वाहन पाठलाग करून सडावण गावाजवळ थांबवण्यात आले. तेव्हा पिकअप वाहन क्रमांक(एम.एच. ४१ जी. २९६८) मध्ये दहा गुरे निर्दयीपणे कोंबून भरण्यात आलेली होती. वाहनातील एक जण पळून गेला. पोलिसांनी अर्शद खान अल्ताफ खान (वय २६, रा. कमालपुरा, मालेगाव) याला ताब्यात घेतले. अमोल पाटील यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून दहा गुरांची मुक्तता करण्यात आली. त्यांना पांझरापोळ गोशाळेत रवाना करण्यात आले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.