कचरा टाकण्याच्या वादावरून एकावर कोयत्याने वार.. शहाआलम नगर येथील घटना.

अमळनेर/प्रतिनिधि. अमळनेर कचरा टाकण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर भांडणात होऊन कोयत्याने वार करून दोघांना जखमी केल्याची घटना २८ रोजी सकाळी ११ वाजता शाह आलमनगरात घडली.
एजाज सय्यद अलीम याच्या पत्नीला अन्वरखान मेहताब, तन्वीर खान अन्वर, इम्रानखान अन्वर, अलिशानवी अन्वर हे चापट बुक्क्यांनी मारहाण करत होते. तन्वीर याच्या हातात कोयता आणि इतरांच्या हातात लाठ्याकाठ्या होत्या, एजाज हा मारहाण करणाऱ्यांना पत्नीला मारू नका, असे सांगत असताना अन्वरखान – याने काठीने मारहाण सुरू केली.एजाजचे वडील अलीम सय्यद हमीद भांडण सोडवायला आले असता तन्वीरने हातातील कोयत्याने त्यांच्या हातावर वार करून जखमी केले, एजाज वडिलांना सोडवायला गेला असता तन्वीरने त्याच्याही डोक्यावर गंभीर वार केला, एजाज रक्तबंबाळ होऊन खाली पडला.
त्यावेळी चौघे पुन्हा कचरा टाकला तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन निघून गेले. दोधा जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दवाखान्यात जबाब घेतल्यानंतर चारही आरोपीविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष पवार तपास करीत आहेत.