सखाराम महाराज यांची वार्षिक यात्रा आजपासून मोठ्या उत्साहात शुभारंभ.

अमळनेर /प्रतिनिधी. विठ्ठल रुक्मिणी संस्थान अमळनेर पंढरपूरच्या वतीने श्री संत सखाराम महाराज यांचा वार्षिक यात्रा आजपासून उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे, या उत्सवाची जय्यत तयारी संस्थान तर्फे सुरू करण्यात आली आहे. अक्षय तृतीयेनिमित्त दि. १० मे रोजी संस्थांनचे गादीपुरुष परमपूज्य संत श्री प्रसाद महाराज यांचे उपस्थितीत स्तंभारोपण व ध्वजारोहन होऊन यात्रोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. नदीपात्रात सकाळी ९ वाजता लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असून त्यानंतर प्रसाद महाराजांच्या हस्ते सर्वांना यात्रोत्सवाचे निमंत्रण व सोबत नारळ व प्रसाद दिला जाणार आहे. १० मे ते १७ मे दररोज सकाळी ९ ते १२ पर्यंत श्री संत तुकाराम महाराज गाथा भजन होणार असून १८ मे मोहन महाराज बेलापूरकर महाराज यांच्या दिंडीचे आगमन होऊन गाथा भजन ची सांगता होणार आहे. दि १९ वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीला सायंकाळी रथोत्सव तर दि २३ रोजी वैशाख शुद्ध पौर्णिमेला सकाळी ६ पासून पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. दि २४ रोजी मोहन महाराज बेलापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार आहे.याव्यतिरिक्त अनेक विशेष कार्यक्रम पार पडणार असून सोबत नदी पात्रात मोठ्या प्रमाणात थाटनाऱ्या यात्रोत्सवाचा सर्वांना आनंद घेता येणार आहे.