मोटरसायकलने धडक दिल्याने एकाचा मृत्यू.

अमळनेर/ प्रतिनिधी
अमळनेर रस्त्यावर बंद पडलेल्या चारचाकी वाहनाचा डिझेल नॉब तपासण्यासाठी उतरलेल्या चालकाला मोटरसायकलने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना धुळे रस्त्यावर घडली. अमळनेरहून धुळ्याकडे जाणारी गाडी (एमएच१८/एजे९११९) ही मंगरूळ ते लोंढवे फाट्यादरम्यान मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास बंद पडली. चालक सुनील निगडे याने वाहनांचे चारही इंडिकेटर चालू करून डिझेल नॉब तपासण्यासाठी खाली उतरला. त्याचवेळेस अमळनेरकडून धुळ्याकडे भरधाव वेगात जाणारी दुचाकी (एमएच१९/सीसी०६७१) ने त्यास जोरदार धडक दिल्याने तो खड्यात फेकला गेला. त्याच्या पायाला दुखापत झाल्याने त्यास दवाखान्यात • नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ज्ञानेश्वर नंदलाल माळे (मोहाडी उपनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीचालक मनीष चौधरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.