नरेंद्र मोदी, भाजपने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले. -उद्धव ठाकरे यांचा घणाघात

24 प्राईम न्यूज 20 Jun 2024. मी काँग्रेस सोबत गेलो म्हणून म्हणतात की, मी हिंदुत्व सोडले. मला मुस्लिमांनी मते दिल्याचे सांगतात. होय मला देशभक्तांनी, मुस्लिमांनी मते दिली. पण नरेंद्र मोदी आणि भाजपाने देखील सत्तेसाठी हिंदुत्व सोडले आहे. चंद्राबाबू, नितीशकुमार हे काय हिंदुत्ववादी आहेत का असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विचारला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ५८ वा वर्धापनदिन षण्मुखानंद सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात साजरा करण्यात आला. त्यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते शिवसेनेच्यासर्व नवनिर्वाचित खासदारांचा तसेच पराभूत झालेल्या उमेदवारांचाही यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी २०२४-२६ चा शुभारंभ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते फॉर्म भरून यावेळी करण्यात आला. यावेळी ठाकरे म्हणाले की, ‘भाजपा आणि मिंध्यांना माझे आव्हान आहे की, शिवसेनाप्रमुखांचा फोटो न लावता, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह न लावता निवडणूक लढवून दाखवा. पंतप्रधान मोदींनी देखील आतापासूनच विधानसभेचा प्रचार सुरू करून दाखवावा, मग मी आहे आणि ते आहेत. शिवसेना संपविण्याचे अनेक प्रयत्न आजवर झाले पण शिवसेना सगळ्यांना पुरून उरली आहे. भाजपा आणि मोदी अजिंक्य नाहीत. मोदींचे पाय पण मातीचेच आहेत हे आपण निकालातून दाखवून दिले आहे.’