अमळनेर पोलिसांची धडक कारवाई. -डीवायएसपी पथकाच्या सतर्कता व तत्परतेने ३७ मोबाईल सापडले.


अमळनेर /प्रतिनिधी. येथील डीवायएसपी कार्यालयातील पोलिसांच्या सतर्कतेने व तंत्रशोधक पद्धतीचा अवलंब केल्याने हरवलेले ३७ मोबाईल मिळून आले असून मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
सर्वसाधारणपणे मोबाईल हरवणे नित्याची बाब आहे. अगदी किरकोळ प्रमाणात मोबाईल सापडणे शक्य होते. बऱ्याचदा पोलीस देखील प्रयत्न करीत नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण वाढले. डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांनी तंत्रज्ञ पोलीस उज्वल पाटील यांच्यावर मोबाईल शोधायची जबाबदारी टाकली. उज्वल पाटील यांनी तांत्रीक यंत्रणा वापरली असता हरवलेले ३७ मोबाईल राजस्थान ,गुजरात , नाशिक ,पंढरपूर ,अमरावती ,मालेगाव ,भुसावळ ,जळगाव ,धुळे आदी ठिकाणी असल्याचे शोधून काढले. त्यांनंतर तेथील पोलिसांशी संपर्क साधून त्या त्या व्यक्तींकडून मोबाईल जप्त करण्यात आले. उज्वल पाटील ,हितेश बेहरे यांनी विविध ठिकाणाहून मोबाईल परत आणले. आणि मूळ मालकांशी संपर्क करून त्यांना परत देण्यात येत आहेत.
नागरिकांनी आपले मोबाईल व मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवावेत तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून मोबाईल विकत घेऊ नये असे आवाहन डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांनी केले आहे.