राज्यातील शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद !

24 प्राईम न्यूज 18 Sep 2024. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक संचमान्यतेबाबतचा १५ मार्चचा व कंत्राटी शिक्षक भरती बाबतचा ५ सप्टेंबरचा शासन निर्णय वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप करतानाच सदरचे दोन्ही शासन निर्णय रद्द करावे, या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय राज्यातील सर्व संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यभरातील सर्व शिक्षकसंघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत शासनाच्या अन्यायकारक शासन निर्णयामुळे राज्यातील १५ हजार शाळांमधील १ शिक्षक कमी होवुन या शाळांमधील २ लाख विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्याने सदरचे शासन निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावे, अशी आग्रही मागणी संघटनानी केली आहे.