अमळनेर तालक्यातील उपकेंद्राचा वीज पुरवठा १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार बंद

आबिद शेख/ अमळनेर. अमळनेर तालुक्यातील जानवे येथील फिडरमध्ये तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्याने, आज दि २८ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत जानवे, वावडे आणि भरवस या उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित होणार आहे. महावितरणचे कार्यकारी अभियंता तुषार नेमाडे यांनी ही माहिती दिली. जानव्याच्या ३३ केव्ही फिडरचे देखभाल-दुरुस्तीचे काम आणि विद्युत तारांना नडणारी झाडे तोडण्याचे काम या कालावधीत हाती घेतले जाणार आहे. यामुळे या तीनही केंद्रांतील सुमारे २० हजार ६०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार आहे.
नागरिकांना विनंती आहे की, वीजपुरवठा खंडित होणार असल्याने आपली सर्व कामे सकाळी १० वाजेच्या आधी पूर्ण करावीत, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.