अकरावीत प्रवेशासाठी गणित, विज्ञानात ३५ नव्हे २० गुण पुरेसे

24 प्राईम न्यूज 23 Oct 2024.

विद्यार्थ्यांना शत्रूसमान भासणारे गणित आणि विज्ञान या दोन विषयांमध्ये ३५ गुण मिळवतानाही काही विद्यार्थ्यांची पुरत दमछाक होते. ३५ पेक्षा कमी गुण मिळाले की दांडी गुल झालीच म्हणून समजा. अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण (एसएससी) मंडळाने मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या शैक्षणिक वर्षातील दहावी बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये ३५ पेक्षा कमी आणि २० पेक्षा जास्त गुण मिळाले तरी विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश घेता घेणार आहे. नव्या अभ्यासक्रम आराखड्यात यासंदर्भात तरतूद केली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्याला राज्य शासनाच्या सुकाणू समितीने अंतिम मान्यता दिली आहे. गणित आणि विज्ञान विषयाबद्दल काही विद्यार्थ्यांच्या मनात मोठी भीती असते. विद्यार्थ्यांच्या मनातून ही भीती घालवण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. राज्य मंडळातर्फे दहावीची परीक्षा (एसएससी) घेण्यात येते. प्रचलित पद्धतीनुसार दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी सर्व विषयांत किमान ३५ गुण मिळवावे लागतात. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना सत्र कायम ठेवण्याची मुभा (एटीकेटी) असल्याने अकरावीला प्रवेश मिळतो, परंतु अनुत्तीर्ण विषयात संबंधित विद्यार्थ्यांना उत्तीर्ण व्हावेच लागते.