मुलांना पळवून नेण्याचा संशयावरून तांबेपुरा भागात तिघांना नागरिकांकडून चोप.

0

आबिद शेख/अमळनेर. अमळनेर मुलांना पळवून नेण्याच्या संशयावरून तांबेपुरा परिसरात तिघांना नागरिकांनी चोपून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी करून त्यांच्या कुटुंबासमक्ष त्यांना सोडून दिल्यानंतर विनापरवानगी गावात वस्तू विक्री करीत असल्याने गाव सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

३० रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास जडीबुटी व खडे रत्न विकणारे तिघे फिरत होते. तांबेपुरा भागात कामासाठी परराज्यातील कामगार कुटुंब आली आहेत. त्या कुटुंबातील लहान मुले खेळत असताना तिघांनी मुलांना ओढण्याचा प्रयत्न केला, असा संशय कुटुंबांना आल्याने आरडाओरडा झाली. परिसरातील लोकांनी तिघांना चोप दिला. पोलिसांना माहिती देताच पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलिस कॉन्स्टेबलजितेंद्र निकुंभे, सुनील पाटील, मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, संजय सोनवणे, होमगार्ड पूनम हटकर घटनास्थळी पोहोचले. तिघांना अमळनेर पोलिस स्टेशनला आणण्यात आले.

सखोल चौकशी केल्यानंतर असे आढळून आले की, हे तिघे आपल्या कुटुंबासह गजानन महाराज मंदिराजवळ बऱ्याच दिवसांपासून जडीबुटी व खड्यांचे रत्न विक्रीसाठी आले आहेत. त्यांचे कुटुंब पोलिस स्टेशनला आले. पोलिसांनी त्यांचे आधारकार्ड तपासून सखोल चौकशी केली आणि कुटुंबासह त्यांना सोडण्यात आले. मात्र, त्यांनी शहरात आल्यावर पोलिसांना कळवायला पाहिजे होते आणि तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. म्हणून संशयामुळे अधिक अनर्थ घडू नये म्हणून त्यांना गाव सोडण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!